जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । यंदा केरळमध्ये मान्सूनने ३० मे रोजीच एंट्री केली असून यांनतर आता मान्सूनचे महाराष्ट्रात कधी आगमन होणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र अशातच हवामान विभागाकडून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे 9 ते 10 दिवसांत मान्सूनचं आगमन राज्यात होतं. मात्र आता मान्सूनची गती मंदावल्यानं मान्सून राज्यात दाखल होण्यास विलंब होऊ शकतो. मान्सूनच्या पुढील वाटचालीबाबत बोलताना हवामान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, मान्सून केरळात पोहोचल्यानंतर पूर्वोत्तर भारताच्या दिशेनं तो अधिक वेगानं सरकरला, मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान्सूनची अपेक्षित गती कमी झाली असून, वाटचाल मंदावली आहे.
हवामान विभाग अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मान्सूनची वाटचाल ही धिमी राहणार आहे, ही बातमी त्या राज्यांसाठी चिंताजनक ठरू शकते, ज्या भागांमध्ये केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर लगेच त्याचे आगमन होते.
दरम्यान, मान्सूनला पुन्हा एकदा आपली गती पकडण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात असं हवामान विभागानं म्हटलं आहे. तो पर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे, आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.