जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करुन आता वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. यंदा दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल आहे. भारतीय हवमान खात्याने या संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.आता महाराष्ट्रात आठवडाभरात मान्सून येणार असल्याची शक्यता आहे.
खरंतर १ जूनही मान्सूनच्या आगमनाची तारीख असते, मात्र यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.मागील वर्षी देशभरातील अनेक भागांत मान्सूनने सरासरी गाठली नव्हती. महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. या पावसाचा परिणाम खरीप व रब्बी हंगामावर झाला होता. आता मे महिन्यातच राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा संपला आहे.
यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मान्सूनची केरळपर्यंत वाटचाल दमदार झाली आहे. मान्सून वेळे आधीच आल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस ५ जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये १० जूनपर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, वेळेच्या आधीच मान्सूनची एन्ट्री झाल्याने बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच बंगालच्या उपसागरात मान्सून मजबुत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून लवकर बरसेल, असाही अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता कोकणात पाऊस बरसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.