जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकिर्दीला आता शंभर दिवस होणार असून त्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळाने त्यांच्या जाहीरनाम्यातील महत्वाचा विषयाला मंजुरी दिली आहे. एक देश एक निवडणूक या विषयावरील माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
आज बुधवारी झालेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला, त्याला मंत्रिमंडळाने एकमताने मंजुरी दिली. रामनाथ कोविंद यांच्या समितीने लोकसभा आणि राज्यातील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 100 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजे, असे म्हटले आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने 62 राजकीय पक्षांशी संपर्क साधला होता. त्यापैकी 32 पक्षांनी ‘एक देश, एक निवडणुकी’ला पाठिंबा दिला होता. तर 15 पक्ष विरोधात होते. 15 पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली होती.