जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२५ । २ डिसेंबरला पार पडलेल्या नगरपंचयात आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार होता. मात्र औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने 21 तारखेला हा निकाल लावावा असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले. दरम्यान ईव्हीएमसोबत छेडछाड केला जाईल असा आरोप महाविकासआघाडी करत असताना आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पोलिस आणि प्रशासनावर भरोसा नसल्याचे चित्र आहे.

जळगावच्या भडगाव आणि पाचोरा या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूमला सरकारी सुरक्षा यंत्रणेसह गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या उमेदवारांच्या आग्रहास्तव हे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.या निर्णयाने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीच या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार सामना रंगलेला आहे.प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. मतदान ईव्हीएमध्ये बंद झाल्यानंतर आता ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये बंदिस्त असून 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केल्याने काही राजकीय विरोधकांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेसंदर्भात चर्चा होऊ शकते.











