जळगाव लाईव्ह न्यूज । नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून यादरम्यान, राज्यपालांच्या भाषणामध्ये आदिवासी, मागासवर्गीयांच्या योजनांचा कोणताही प्रकारे उल्लेख नाही. राज्यातील महायुती सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्या विरोधात आहे. राज्यात मागासवर्गीयांवर अन्याय होतोय. राज्यपालांच्या अभिभाषणात संविधानाबद्दल कोणताही प्रकारचा उल्लेख नसल्याची खंत शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
शासकीय अहवालानुसार एकट्या नंदुरबार जिल्ह्यात आठ वर्षात ५,८८८ बालकांचा मृत्यू झाला. तसेच ३३,००० कुपोषित बालके असल्याचा देखील अहवाल समोर आला. महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांमध्येच कुपोषित बालकांच्या मृत्यूची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. राज्यात चाललेला मृत्युंचा तांडव हे सरकार थांबवणार की नाही? असा सवाल आमदार खडसे यांनी सभागृहात उपस्थित केला.
राज्यात आजही अनेक ठिकाणी आदिवासी आणि मागासवर्गीय किड्या मुंग्यांसारखे जीवन जगत आहेत. राज्य सरकारकडून कुपोषणाबद्दल एक विशेष मोहीम घेण्यात यावी. या सरकारच्या मनात आदिवासींच्या बाबत कोणत्याही प्रकारची भावना नसल्याची खेद आमदार खडसे यांनी सभागृहात व्यक्त केला.