जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत झिरवाळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

माहितीनुसार, हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असून तो मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चित्रित झाल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचे सांगितले जात असून, त्या व्यक्तीच्या नातेवाईकाने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आणि मंत्री एकत्र दिसत असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत झिरवाळ यांच्या वर्तनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे हे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे असून, मुख्यमंत्रीांनी तात्काळ कारवाई करावी.
विशेष म्हणजे, यापूर्वीही झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्या वेळीही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता नव्या व्हिडिओ प्रकरणामुळे त्यांच्यावरील दबाव आणखी वाढला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सरकार पुढे कोणती भूमिका घेते आणि झिरवाळ यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








