शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. वडनगरी फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून पालकमंत्र्यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
वडनगरी फाटा येथे ५ ते ११ डिसेंबरदरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्या वतीने पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्र्यांनी आयोजक संस्था व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व अशोक जैन यांच्या हस्ते मुख्य सभा मंडपाचे उभारणी कामांचे उद्घाटन करण्यात आले.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, शिव महापुराण कथेसाठी जळगाव जिल्ह्यात ६ लाख भाविक येणार आहेत. यासाठी जिल्हावासियांनी आयोजकांना सहकार्य करावे. कार्यक्रमासाठी वाहतूक नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे. सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, भोजन, आंघोळीसाठी गरम पाणी याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे.
चोपडा – जळगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, साईड पट्ट्या भरण्यात यावे. मंदीर परिसरात रबरचे स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे. पाळधी-आव्हाने रस्त्याची ही दुरूस्ती करण्यात यावी.असे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महावितरणने याठिकाणी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसवावा. पथदिवे बसविण्यात यावे. स्वतंत्र आरोग्य पथक नेमण्यात यावे. साफसफाईची चोख व्यवस्था ठेवण्यात यावी. वाहतूकीचे चोख नियोजन करण्यात यावे. महावितरण, आरोग्य, पोलीस व बांधकाम विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवत काम करावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयोजक समिती, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.