जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज गुरुवारी जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित अवकाळी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकणातील काही जिल्ह्यांतही अवकाळी पाऊस होऊ शकतो. असं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावी, असा सल्लाही भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
जळगावातही अवकाळीचा अंदाज
दरम्यान, दोन तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावत काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच हवामान खात्याने आज जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
दि. १ मार्चनंतर वातावरणात बदल होऊन, पावसाची शक्यता कमी होऊन तापमानात वाढ होणार आहे. सोमवारी अवकाळी पाऊस झाल्यानंतरही तापमानात घट न होता, वाढ झाली. बुधवारी जळगाव शहराचा पारा ३५ अंशापर्यंत गेला होता. रात्रीचे तापमान १६ अंशावर होते. भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आगामी तीन दिवसात पारा ३७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.