जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२३ । मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून येत्या 24 ते 48 तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे 4 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र अरबी समुद्रावर तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली होती. आता मात्र मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. मान्सूनचा पुढील प्रवास मात्र वातावरणाच्या अनुकूलतेवर अवलंबून असणार आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात बिपोरजॉय चक्रीवादळ तयार झाल्यामुळे केरळमध्ये मान्सून उशीरा दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणूनच देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
गुरुवारपासून देशातील अनेक राज्यात उष्णता आणखी वाढणार आहे. बिहार आणि पश्चिम बंगालसह 6 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (heat wave)ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. तसंच या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.