जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झालीय. आणि या महिन्यात पाऊस कसा राहणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) सप्टेंबर महिन्यासाठी भारतातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. सप्टेंबरमध्ये देशभरात मान्सून सामान्यपेक्षा जास्त पडू शकतो, असा अंदाज वर्तविला आहे. ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग, दक्षिण भारतातील अनेक भाग, उत्तर भारताच्या काही भागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता. तर जळगाव जिल्ह्यात देखील दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा हवामान विभागाकडून जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल अशी शक्यता वर्तविली होती. यंदा मात्र जिल्ह्यातील पावसाची स्थिती प्रत्येक महिनानिहाय बदलताना दिसत आहे. जून महिन्यात सरासरी तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्ह्यात सरासरीपेक्षा ११४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ९२ टक्के पाऊस झाला असून, अजूनही पावसाची ८ टक्के एवढी तूट आहे.

खरंतर जिल्ह्यात यंदाच्या ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. दुसरीकडे पावसाने पाठ फिरविल्याने तापमानत वाढ होऊन उकाडा वाढला होता. पावसाअभावी खरिपाच्या पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. मात्र जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला तर शेती पिकांचेही मोठं नुकसान झाले. यातच मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु असून अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावली. या सततच्या पावसामुळे आता खरीप पिके धोक्यात आलीय. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे किडीचा देखील मोठा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. परिणामी, पिकांची वाढ खुंटली असून,उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आता सप्टेंबर महिन्यात देखील जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना आणखी फटका बसू शकतो. गेल्या पाच वर्षांमधील सप्टेंबर महिन्यातील पावसाची स्थिती पाहिली तर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे.सप्टेंबर महिन्यात एकूण सरासरी १२३ मिमी इतकी आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक पाऊस गेल्या पाच वर्षांत झाला आहे.सध्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात रविवारी पावसाने उघडीप दिल्याचे घेतल्याचं दिसून आले. मात्र आगामी दिवसात जोरदार पावसाचा अंदाज आहे
दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुंबून भरले आहे. अर्धा जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा देखील ९० टक्क्याच्या आसपास पोहोचले आहे. तर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातही मुबलक जलसाठा असल्याने जळगावकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.





