जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । जागतिक महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात महागाई वाढू लागली आहे. देशात सर्वच गोष्टीच्या किमती महागल्यामुळे सर्वसामान्य होरपळून निघत आहे. नागरिकांना आता दैनंदिन वापराच्या उत्पादनांसाठी त्यांचा खिसा अधिक मोकळा करावा लागत आहे. अशातच आता महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. अत्यावश्यक औषधांच्या (Essential Medicines) किमती एप्रिलपासून वाढणार असून, या औषधांच्या किमतीत थेट 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी-व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत.
इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, भारताच्या औषध किंमत प्राधिकरणाने शुक्रवारी अनुसूचित औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली. एप्रिल महिन्यापासून नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या (NLIM) अंतर्गत 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत. ही परवानगी दिलेली सर्वोच्च दरवाढ आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 मार्च रोजी, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA), भारतातील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारी सरकारी नियामक संस्था, कंपन्यांना घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित किंमती वाढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर 1 एप्रिलपासून सर्व जीवनावश्यक औषधांच्या किमती वाढू शकतात, असे सांगण्यात आले.
875 हून अधिक औषधांचा समावेश
अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये मधुमेह, कर्करोगावरील औषधे, हिपॅटायटीस, उच्च रक्तदाब, किडनी रोग इत्यादींवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या अँटीरेट्रोवायरलसह 875 हून अधिक औषधांचा समावेश आहे.
अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीचा भाग नसलेल्या कंपन्यांना त्यांच्या किमतीत दरवर्षी १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची परवानगी आहे. सध्या, ३० टक्क्यांहून अधिक फार्मास्युटिकल मार्केट थेट किंमत नियंत्रणाखाली आहे.
एकीकडे औषधांच्या किमतीत वाढ होणार असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती रोज वाढताना दिसत आहेत. बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने यापूर्वीच शंभरी पार केली आहे. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.