जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलांची स्वच्छता मोहीम मनपाने हाती घेतली असून गेल्या दोन दिवसात ४ प्रमुख व्यापारी संकुल स्वच्छ करण्यात आले आहेत. गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध जाहीर केले असल्याने शहरातील व्यापारी संकुल बंद आहेत. मनपा मालकीच्या व्यापारी संकुलात अस्वच्छता वाढली असल्याच्या तक्रारी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे आल्या होत्या. महापौरांनी आरोग्य विभागाला सूचना देत तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याचे सांगितले होते. तीन दिवसापूर्वी गोलाणी मार्केटची स्वच्छता केल्यानंतर महात्मा फुले मार्केट, जुने, नवीन बी.जे.मार्केटची स्वच्छता करण्यात आली. गुरुवारी सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी प्रत्यक्षात जाऊन स्वच्छता अभियानाची माहिती घेतली.
दरम्यान, मनपाकडून शहरातील सर्व लहानमोठ्या व्यापारी संकुलांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असून स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे.