⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

महापौर जयश्री महाजन यांनी दिले खासदार उन्मेष पाटील यांना निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरातील ईच्छादेवी चौक ते ‘डी’ मार्ट पुढे रायसोनी/देवकर कॉलेजपर्यंतचा रस्ता जळगाव महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ‘न्हाई’ यांच्यातील तांत्रिक अडचणींमुळे सदर रस्ता देखभाल, दुरुस्ती व बनविणे हे जळगाव मनपाला तयार करता येत नाही. यामुळे सुमारे एक लाख हून अधिक रहिवाश्यांना यामुळे जीवघेणा त्रास होतो आहे, शहराचे नावलौकिकास बाधा पोहोचत आहे. याविषयी जळगाव शहराचे लोकप्रतिनिधी व खासदार या नात्याने आपण संबंधित अधिकारी व यंत्रणेशी समन्वय साधून जनतेचा प्रश्न सोडवावा. या आशयाचे निवेदन जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका यश्री सुनिल महाजन यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांना दिले.

सोमवार, दि.22 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स मधील खासदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन महापौर महाजन यांनी सदरहू निवेदन दिले. यावेळी महापौर सौ.महाजन यांनी यासंदर्भातील शासकीय पत्रव्यवहार, शासनाचे गॅझेट व सर्क्युलर सुद्धा निवेदनासोबत संलग्न करुन दिले व याविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी लखीचंद पाटील, निरंजन पाटील हे उपस्थित होते.

ईच्छादेवी चौक ते ‘डी’मार्ट पुढे रायसोनी/देवकर कॉलेज पर्यंतचा रस्ता हा केंद्र शासनाच्या राजपत्रानुसार चार कि.मी.चा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘न्हाई’च्या मालकीचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातूनच रस्त्याची बांधणी होईल. तत्पूर्वी गणेश विसर्जनासाठी या रस्त्याची दुरुस्ती ही ‘न्हाई’ व पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून सीएसआर फंडातून करण्याचा पर्याय असून शुक्रवारी पुन्हा यासंदर्भात अंतिम निर्णय होईल, असे यावेळी उन्मेश पाटील यांनी सांगितले. तसेच पुढे तांत्रिक बाबी तपासून, पाठपुरावा करुन ‘न्हाई’कडून हा रस्ता नव्याने तयार करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वात मोठी अडचण ठरलेल्या ईच्छादेवी चौक ते ‘डी’मार्ट पुढे रायसोनी/देवकर कॉलेज पर्यंत या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात पाहणी करुन वारंवार पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा तसेच जळगाव महानगरपालिका, जळगाव यांनी वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याला प्रतिसाद देत नाही. यासंदर्भात सोमवार, दि.22 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांकडे खासदार उन्मेष पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली.

या बैठकीत सीएसआर फंडातून गणेश विसर्जनापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा पर्याय पुढे आला असून यासंदर्भात येत्या शुक्रवारी, दि.26 ऑगस्ट 2022 रोजी बैठक बोलाविलेली आहे आणि या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये महापालिकेला अमृत योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात पाणीसाठ्यासाठी व तलाव संवर्धानासाठी निधी उपलब्ध करुन देणे, राष्ट्रीय हेल्थ मिशन- महाराष्ट्र म्हणजेच एन.आर.एच.एम.च्या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयाचा प्रस्ताव, केंद्रीय विद्यालयासाठीच्या जागेसंदर्भातील प्रस्ताव, 42 कोटींपैकी प्राप्त 38 कोटींच्या निधीतून संबंधित ठेकेदाराला शहरातील रस्त्यांची कामे त्वरित सुरु करण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी, महापौर, आमदार, खासदार, पीडब्ल्युडीचे अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता, महापालिका आयुक्त हे उपस्थित राहणार आहेत, असे महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी सांगितले.