जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती

नोव्हेंबर 24, 2025 11:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२५ । जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हेसह इतर संशयितांना अटक केली असून याप्रकरणातील मास्टर माईंड म्हणजे मुख्य सूत्रधार अकबर खान रौनक अली खान (वय ४०, रा. मालाड पूर्व, मुंबई) आणि त्याचा साथीदार आदील सैयद निशार अहमद सैयद (वय ३२, रा. ओशिवरा, मुंबई) पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याचा जबाब सोमवारी नोंदवण्यात येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

bb

जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के. फार्म हाऊसवर सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यावर पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे तसेच इतर संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे. सदरचे कॉल सेंटर मुख्यत्वे विदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी कार्यरत होते. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत संस्थांचे प्रतिनिधी म्हणून ओळख देत डेटा पडताळणी, सुरक्षा तपासणी आणि अन्य आमिषे दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढत होते, हे प्राथमिक तपासातून उघड झाले. याशिवाय, जप्त केलेल्या दोन लॅपटॉपवर आर्थिक व्यवहारांचे पुरावेही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisements

गेल्या दीड महिन्यांपासून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना, त्या मागील रॅकेटच्या प्रमुख सूत्रधारांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु होते. या बोगस कॉल सेंटर प्रकरणाच्या तपासात मोठी प्रगती पोलिसांनी केली आहे.

Advertisements

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अकबर खान आणि त्याचा साथीदार आदिल सय्यद निसार अहमद सय्यद या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी मुंबईतील एका फ्लॅटमध्ये सापळा रचून ताब्यात घेतले. दोघांना शनिवारी जळगावात आणून न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची संख्या १० वर पोहोचली असून, पुढील काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now