जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । मधुकर सहकारी साखर कारखान्याला ऊस विक्री करून सहा वर्षे उलटली तरी कारखाना उसाची थकबाकी देत नसल्याने लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव व मुक्ताईनगर तहसीलदार यांना दिले आहे. जळगाव जिल्हा व बुलढाणाजिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहा वर्षांपूर्वी मधुकर सहकारी साखर कारखान्याला ऊस लागवड करून विक्री केली आहे. परंतु गेल्या सहा वर्षांपासून कारखान्याकडे आमची उसाची थकबाकी आहे.
विनंती करून लोकशाही मार्गाने आमचे उसाचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी न्यायालय उच्च औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन क्र. १४३९२/२०२४ नुसार कोर्टात केस दाखल केली. त्या केसचा निकाल दि. १२ डिसेंबर २०२३ ला शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. कोर्टाने दोन महिन्यांच्या आत उसाची थकबाकी देण्याचे आदेश दिले होते. परंतु आता चार महिने झाले तरीसुद्धा शेतकऱ्यांना उसाची थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे हे ऊस उत्पादक पूर्णतः हवालदिल झालेले आहेत.
न्याय मिळत नाही म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर हे शेतकरी कुटुंबासह बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुक्ताईनगर तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार कार्यालयात उपस्थित रावेर लोकसभा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर रवींद्र प्रभाकर रायपुरे, भीमराव वासुदेव झाल्टे (हरसोडा ता. मलकापूर) दीपक पटेल, मीराबाई राजपूत, कोमलसिंग राजपूत (मुक्ताईनगर) आदींच्या सह्या आहेत