जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । चाळीसगाव शहर पोलिसांनी तब्बल २४ लाख ६९ हजार १५० रुपये किमतीचा ४२ किलो ५८३ ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त करत असताना नाकाबंदीमध्ये ही कारवाई करण्यात आली. मारुती स्विफ्ट डिझायर (MH 12 KN 2305) या पांढऱ्या रंगाच्या वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या डिकीत निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला. या प्रकरणी शेख नदीम शेख बशीर (वय ४०, रा. गुलवानी खालदा, गल्ली क्र. ३, मालेगाव, जि. नाशिक) याला घटनास्थळीवरुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजासह तस्करीसाठी वापरलेले वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा गांजा साठवून ठेवण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड पोलिसांनी छापा टाकून तेथून सुमारे ४५० किलो गांजा जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता शनिवार (दि.3) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.