जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । मान्सूनची उत्सुकता लागलेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीलंकेच्या वेशीवर अडकलेला मान्सून येत्या ४८ तासात पुढे सरकणार असून तो दक्षिण अरबी समुद्रात मान्सून (Monsoon) दाखल होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही काही दिवसातच मान्सूनचे आगमन होणार आहे.
यंदाचा मान्सून वेळे आधीच अंदमानमध्ये दाखल झाला. त्यानंतर काही दिवसापासून मान्सूनचा श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबा झाला आहे. त्यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास लांबण्याची शक्यता होती. मात्र, आता येणाऱ्या ४८ तासांत मान्सून (Monsoon) पुढे सरकण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानुसार उद्या २७ मे रोजी केरळमध्ये मान्सून सक्रीय होईल.
तर पुढील पाच दिवसात म्हणजेच १ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पण हा पाऊस कोकण, गोव्यात आणि राज्यातील काही भागात पडेल. हा पाऊस मध्यम कमी प्रमाणात बरसण्याची शक्यता आहे. तसेच पुढे काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नैऋत्य मॉन्सून पुढील ४८ तासांत नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन परिसर, दक्षिण आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
एकीकडे मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झालेली असताना देशातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. हवामान विभागाने पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.