मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी मंदाकिनी खडसे यांना आज १० वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे. त्यानंतर आज मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
या जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.
मागील महिन्यात ईडीकडून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.