रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा ; महापौरांनी केल्या सूचना
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू असून कोणत्याही कामात मक्तेदाराने हलगर्जीपणा करू नये. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम चांगले करून घ्यावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.
शहरात सुरू असलेल्या रस्ते डागडुजीच्या कामाची महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी पाहणी केली. महापौरांनी चित्रा चौक ते राजकमल चौक, ईच्छा देवी चौक ते पांडे डेअरी चौक आणि शिवाजी नगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.
महापौरांनी सांगितले की, मक्तेदाराने काम करताना साहित्य चांगल्या दर्जाचे वापरावे, काम करताना योग्य गुणवत्ता राखावी, जेणेकरून रस्ते अधिक काळ चांगले राहतील. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून चांगले काम करून घावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाहणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.