जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यात 16 डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच महायुतीचे मंत्रिमंडळाचे घोडे गंगेत नाहून निघणार असल्याचे सांगीतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तर एकनाथ शिंदे हे ठाण्यात आहेत. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्यांच्या काही मंत्र्यांबाबत अजून एकमत झाले नसल्याचे समोर येत आहे.
तर गृहमंत्री पदावरून शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते दिल्लीला गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कधी होणार विस्तार?
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला जवळपास निश्चित झाला आहे. आज अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली. बहुतेक 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती त्यांनी दिली. या दिवशी 30 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे यांची नाराजी दूर?
दरम्यान एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला गृहखात्यासह महसूल खाते पण देण्यात येणार नाही तर नगरविकास मंत्रालय देण्यात येईल असे कळते. या फॉर्म्युलानुसार भाजपाला 15 ते 16 मंत्रीपदं मिळू शकतात. तर शिंदे सेनेला 8 अथवा 9 आणि अजित दादा गटाला 8 किंवा 9 मंत्रीपदं मिळू शकतात. पहिले मंत्रिमंडळ हे 32 ते 43 जणांचं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.