जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्त्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात त्यासाठी आपले नेतृत्व कसे आहे याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी संपुर्ण जगात हिंसा सुरू होती त्यावेळी महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला. हिंसा म्हणजे अंधकाराचा मार्ग असून अहिंसक मार्गाने निर्माण झालेले नेतृत्व हे शाश्वत असते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आजपासून ते ४ ऑक्टोबर पर्यंत नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पच्या उद्घानाप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ. के. बी. पाटील बोलत होते. नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पमध्ये नेपाळसह, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मिर, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासह १६ राज्यातील युवकांनी सहभाग घेतला आहे. संपुर्ण भारतातील सहभागी युवकांनी एकमेकांना सुतीहार घालून आगळ्यावेगळ्यापद्धतीने स्वागत केले.
सौ. अंबिका जैन यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याविषयी सांगितले.महात्मा गांधीजींनी उद्योगाकडे विश्वस्त भावनेने बघितले. ह्याच संस्कारातुन श्रध्देय भवरलालजी जैन यांनी गांधीजींच्या विचार-प्रसारासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची निर्मिती केली. जागतिक दर्जाचे ‘खोज गांधीजी की’हे मल्टीमिडीया म्युझियम, गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रंथालय यासह ग्राम उद्योग वाढीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले विविध उपक्रमांमुळे सकारात्मक बदल होत असल्याचे अंबिका जैन म्हणाल्या.
डॉ. अश्विन झाला यांनी गांधीयन लिडरशिप कॅम्प आजही का आवश्यक आहे याबाबत सांगितले. मूल्य, सिद्धांताला धरून नेतृत्व म्हणजे गांधीजीचे विचार आहेत तेच नेतृत्व आजच्या युवकांमध्ये निर्माण व्हावे यासाठी २०१७ पासुन गांधी रिसर्च फाऊंडेशन हा कॅम्प घेत आहे. यात सामर्थ्याच्या आधारावर साधारण जीवनशैलीतून असाधारण कार्य करणाऱ्या गांधीजींच्या मुल्याधारीत नेतृत्वाची आजच्या पिढीमध्ये संस्कार व्हावेत या भावेनूतन हा उपक्रम आहे. देशात व्यक्तिमत्त्व विकासापेक्षा चारित्र्य महत्त्वाचे आहे तेच नेतृत्व निर्माण करण्याचे काम या कॅम्पच्या माध्यमातून होत आहे.
प्रो. गीता धरमपाल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्यापैकी कोणी नेता नाही आणि अनुयायीसुध्दा नाही. ही एक महान मानसिकता तयार करा. चांगले आचरण करणे, परस्परांशी सहकार्य भावना ठेवणे, त्यात सत्यता असावी, लोकांचा विश्वासभाव जिंकताना दुसऱ्यांच्या आदर करा, चांगले करण्याची जबाबदारी घ्या, नेतृत्वासाठी अनुयायांची नाही तर साहसाची आवश्यकता आहे. आपल्यातील असलेली ताकद व कमजोरी स्वतः समजून घेतले पाहिजे.टिम वर्क महत्त्वाचे आहे हे समजून अहंकारचा त्याग करून प्रेमाने सर्वांशी वागणे म्हणजे नेतृत्व म्हणता येईल. सकारात्मकत वर्तन ठेऊन दुसऱ्यांचा आदर करा असे गीता धरमपाल यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी असलेल्या सौ. निशा जैन यांनी सांगितले की, संपुर्ण विश्वात व्यक्तिमत्व विकासासह वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत मात्र चारित्र्यवान व्यक्तीमत्व घडविण्याचा कुठलाही अभ्यासक्रम नाही. तो फक्त आपल्याला महात्मा गांधीजींच्या संस्कारात मिळतो.यातूनच चारित्र्यवान नेतृत्व घडवावे व जे चांगले आहे त्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवून पुढे यावे आणि आपल्यासह देशाच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन सौ.निशा जैन यांनी केले.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलाने झाली. यानंतर अनुभूती निवासी स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘घुम चरखे घुम..’ हे गीत म्हटले. नितीन चोपडा यांनी सुत्रसंचालन केले. गिरीश कुळकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला
विविध विषयांवर होईल मंथन
गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू झालेल्या नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्प युवकांना गांधी विचार समजावे अहिंसा, सत्य या विचारांचे नेतृत्व कौशल्य निर्माण व्हावे, यासाठी मुल्यवर्धित शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. या कॅम्पमध्ये गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधीजींचे पणतू तुषार गांधी, मध्यप्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक सौ.अनुराधा शंकर, डॉ. एम. पी. मथाई, कल्याण अक्कीपेडी, विनय चारूल, रमेश पटेल, अमृत देशमुख, अशोक जैन, अनिल जैन, मुंबईचे प्रसिध्द गजलकार फराजखान अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.