जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२४ । राज्यात सध्या विधानसभा निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. यामागील दोन तीन दिवसात जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात घट दिसून आल्याने रात्री आणि सकाळी कडाक्याची थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, तर सांताकृजमध्ये सर्वाधिक तापामान नोंदवण्यात आले. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठीकठिकाणी आता शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. स्वेटर, गरम कपडे कपाटातून बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ नोव्हेंबरनंतर संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई, कोकणात दुपारी उन्हाचा प्रचंड कडाका असल्याचे जाणवते. दुसरीकडे विदर्भा आणि उत्तर महाराष्ट्रात रात्री हवेत थंडावा जाणवत आहे. राज्यात सर्वांनाच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता कमीच आहे. १५ नोव्हेंबरनंतर थंडीला सुरुवात होईल.
राज्यात कुठे थंडी, कुठे उन्हाचा चटका –
मागील दोन दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट होत आहे, त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पारा १५ अंश सेल्सिअसवर आलाय. निफाडमधील तापमान १३ अंशावर पोहचलेय. पण दुसरीकडे कमाल तापमानातील वाढ कायम आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे शुक्रवारी उच्चांकी ३६ अंश तापमान नोंदवले गेले. तर जळगावात कमाल तापमान ३४ अंशावर आले तर किमान तापमान १५ अंशावर पोहोचले. आज राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.