जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२५ । राज्यात उष्णतेने कहर केला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. एप्रिलमध्येच मे हिटसारखा अनुभव येत आहे. यातच राज्यातील वातावरणात काहीसा बदल होणार आहे. काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितनुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट, दमट हवामानाची शक्यता आहे. तिन्ही विभागांना येलो अलर्ट दिला आहे. आज सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर जळगाव, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे
नागपूरसह विदर्भात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरातसह उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहे. यातच विदर्भात हिट व्हेवमुळे अधिकच त्रास जाणवत आहे. प्रादेशिक हवामान खात्याने दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्टमुळे पुढील दोन दिवस हे तापमान ४५ अंशाचा घरात राहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत आहेत. विदर्भात तीव्र- उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे.