जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । जून संपत आला तरी राज्यातील अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही.यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. आता पावसाबाबत चांगली बातमी आली आहे. राज्यातील इतर भागासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. त्याचसोबतच हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
हवामान खात्याकडून राज्यात पुढील पाच दिवस पाऊस होणार, असा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काही सुचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत
हवामान खात्याकडून दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह, कोकण, मराठवाडा, विदर्भामधील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे. पुढील पाच दिवस पाऊस राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आठवड्यापासून पावसाचा जाेर काहीसा वाढला असून तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जूनमध्ये सरासरी ६६.१ टक्के पाऊस झालेला असून तुट वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधान असून पेरण्या सुरू आहेत.