जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. परंतु आता पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला. आज शुक्रवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज आणि उद्या मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात आज कुठे कोसळणार पाऊस?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाला देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. दरम्यान वादळाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील देखील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, मुंबईमध्ये पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
जळगावातील पावसाची स्थिती?
जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. मात्र आज आणि उद्या जळगावात मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून १२ आणि १३ जुलै रोजी सायंकाळी आणि रात्री पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. जळगावकरांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.