जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२५ । जळगावसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढत असून या थंडीच्या कडाक्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. या थंडीच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रात थंडी परतली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, ज्यामुळे महाबळेश्वरपेक्षा धुळे, जळगाव आणि विदर्भ हे प्रदेश अधिक थंड झाले आहेत. राज्यभर थंडीमुळे शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रात्रीचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. जळगाव शहराचा पारा 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. वारे 10 ते 12 किमी वेगाने वाहत असल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत असल्याने पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.
उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढचे चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या काळात राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे, परंतु गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील नागपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा आणि भंडारा येथे देखील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे.