जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२४ । दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. यामुळे विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील अमरावती, चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील जळगावपर्यंत झाला आहे. काल गुरुवारी जळगावात जोरदार पाऊस झाला. दरम्यान अशात आता मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. यामुळे खंड पडण्याची शक्यता आहे.
सध्या मान्सूनने निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात व्यापला आहे.मान्सूनचे आगमन होताच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काही जिल्ह्यांमध्येही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. मात्र याच दरम्यान हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे.यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो. २० जूननंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत ६ इंच खोलवर ओल गेल्याशिवाय बियाणे रोवू नये, असं सांगण्यात आलं आहे.
जळगावात आज काय आहे अंदाज?
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आज दिवासभर ढगाळ वातावरण नंतर सायंकाळी पावसाची शक्यता आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमान ४० अंशाखाली आहे.