⁠ 
रविवार, मे 5, 2024

मान्सूनने पकडला वेग; या तारखेनंतर राज्यात सर्वत्र चांगला पाऊस, IMD ची माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । जून महिना संपायला आता अवघा आठवडा राहिला तरी देखील राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली नाहीय. महाराष्ट्रात ११ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनला बिपरजॉय चक्रीवादळाने अडथळा आणला. मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु आता त्याची जास्त काही काळ वाट पाहावी लागणार नाही.

बिपरजॉय चक्रीवादळ पुढे सरकल्याने मान्सूनचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिला आहे. 25 जूननंतर राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

त्यात म्हटले आहे की, 23 जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडणार आहेत. तसेच 24 ते 25 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान आहे.

प्रत्यक्षात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र लागला आहे अन् जून महिना संपत आहे. तरीही पाऊस नाही. मात्र आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. पाऊस पडल्यावर पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे कृषी विभागातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे पाऊस पडताच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा जून महिन्यात देशभरात पाऊस खूप कमी झाला आहे. टक्केवारीत हा पाऊस फक्त 37 टक्के आहे.