जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२५ । महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत घेणार आहेत. ज्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील सर्वांच्या नजरा आता या पत्रकार परिषदेकडे लागल्या असून निवडणुकीची घोषणा होताच त्यावेळेपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या, असे निर्देश सरकारला दिले आहे. या निर्देशानंतर सरकारमधील सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाची निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ३ टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जातो.
कधी होऊ शकते मतदान?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान पार पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबरच्या मध्यपर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका जानेवारीच्या १० तारखेपर्यंत होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद होणार असल्याचे समजतेय.

