जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहे. देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडत असून यावेळी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
काय आहेत घोषणा?
शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार आहे. राज्य सरकारच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा हप्ता भरेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 12 हजार रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर टाकली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आणि केंद्र सरकारचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत.
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास आदी ध्येयांवर हा अर्थसंकल्प आधारीत असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
दरम्यान,
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणलं जाणार आहे. 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन केली जाणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीही वाढवली जाणार आहे. यासाठी 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधीची तरतूद केली जाणार आहे.