जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी 12 वीचा निकाल जाहीर केल्यांनतर आता 10 वीच्या निकालीबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनाही उत्सुकता वाढली आहे. यातच दहावीचे निकाल कधी लागणार याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्रकारांनी १० वीचा निकाल कधी लागणार या बाबत प्रश्न विचारला होता. यावेळी केसरकर यांनी १२ वीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचे अभिनंदन करत दहावीचा निकाल 27 मे पर्यंत लागू शकेल, अशी माहिती दिली
“बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारल्याने आनंद आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला आहे बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस अगोदर जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता. मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदान होणे बाकी होते. त्यामुळे राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला,” असे दीपक केसरकर म्हणाले.
खोटी कागदपत्र तयार करणे गुन्हा
दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे बनवून प्रवेश घेतला जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्याबाबतही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आरटीई प्रवेशासाठी पालकांनी खोटी कागदपत्रे बनवून प्रवेश घेणं चुकीचं आहे. खोटी कागदपत्रं तयार करणं गुन्हा आहे. कारवाई झाल्याने पालक खोटी कागदपत्र सादर करणार नाहीत, अशी खात्री आहे. तसेच आरटीई प्रवेशाबाबत गैरप्रकार घडू नयेत याबाबत सूचना देणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.