जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२५ । ‘महाकुंभ २०२५’ दरम्यान प्रयागराजसह इतर स्थानकांसाठी भुसावळ विभागातून २८ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. महाकुंभदरम्यान वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे युद्धपातळीवर कार्यरत आहे. भाविकांची ये-जा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ प्रमुख स्थानकांवरून ३३० हून अधिक गाड्या चालविल्या आहेत. रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत २०१ विशेष गाड्या उपलब्ध करून यात्रेकरूंना मोठा दिलासा दिला आहे.

प्रयागराज जंक्शन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, सर्व नियमित आणि विशेष रेल्वेगाड्या ठरलेल्या वेळेनुसार धावत आहेत. तसेच, प्रयागराज छिवकी, नैनी, सुबेदारगंज, प्रयाग, फाफामऊ, प्रयागराज रामबाग आणि झूसी या स्थानकांवरही रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
भारतीय रेल्वे दर चार मिनिटांनी या स्थानकांवरून गाडी सोडून भाविकांना लवकरात लवकर त्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय करत आहे. विभागीय, प्रादेशिक आणि झोनल स्तरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जात असून, ‘वॉर रूम’च्या सहाय्याने रिअल टाइम देखरेख आणि समन्वय साधला जात आहे.