⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | बातम्या | निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत ‘महाबिघाडी’; अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी

निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत ‘महाबिघाडी’; अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुती विरुध्द महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी स्पष्ट लढत होईल, असे दावे केले जात होते. मात्र राज्यभरात दाखल झालेल्या निवडणूक नामनिर्देशन अर्ज पाहता अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरुध्द महाविकास आघाडीतील बंडखोर अशी लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीआधीपासूनच पाडापाडीचे राजकारण महाविकास आघाडीत दिसू लागल्याने महाविकास आघाडी लवकरच कोसळेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीत अनेक जागांवर रस्सीखेच सुरु होती. अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. विशेषतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांमध्ये वाद शिगेला गेला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यादरम्यान चांगलीच बाचाबाची झाल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.

अनेक मतदारसंघांमध्ये महाबिघाडी
महाविकास आघाडीने परांडा, दक्षिण सोलापूर, दिग्रस आणि मिरज या चार ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केले आहेत. दिग्रस मध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसने मोहन वानखेडे यांना मैदानात उतरवले आहे. सोलापूर दक्षिण मध्ये उद्धव ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अर्ज भरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या रणजीत पाटील यांच्या विरोधात राहुल मोटे यांना उमेदवारी मिळाली आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाचे मनोज जामसुतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे मधू अण्णा चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर अहिल्यानगर शहर ची जागा संजय राऊत यांनी पैसे घेऊन शरद पवार गटाला विकली असा आरोप उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकच करू लागले आहेत. यावरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षांतर्गतच प्रचंड मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे स्वत:ची आघाडी सांभाळू न शकणारे महाविकास आघाडीतील तीन पक्ष महाराष्ट्र काय सांभाळणार, असा प्रश्न निवडणुकीपूर्वीच विचारला जाऊ लागला आहे.

मित्रपक्षांचा विचार नाही
महाविकास आघाडीत शरद पवार यांची राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेससोबतशेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत. मात्र जागावाटप करताना या पक्षांचा साधा विचार देखील करण्यात आलेला नाही. समाजवादी पक्ष इच्छुक असलेल्या जागावर महाविकास आघाडीने आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव परस्पर उमेदवार या जाहीर करून मोकळे झाले आहेत. मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघात एकगठ्ठा मतदानामुळे भाजपचे दीड लाखाहून अधिक आघाडीवर असलेले सुभाष भामरे पराभूत झाले होते. त्याच मतदारसंघात आता समाजवादी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे तसेच धुळे शहर मतदार संघात देखील समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरला आहे. यामुळे येथेही महाबिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण, नांदेड जिल्ह्यातील लोहा या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात देखील शेतकरी कामगार पक्ष मजबूत स्थितीत आहे. मात्र तरीही तेथे मित्रपक्षांना डावलले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले अन्य पक्ष नाराज झाले असून त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजप आपल्या मित्र पक्षांना दगा देतो असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत असतात. पण आज महाविकास आघाडी सोबत असलेल्या पक्षांना एक जागा देखील सोडलेली नाही. यामुळे मित्रपक्षांसोबत दगाफटका कोण करतो? हे देखील स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस-शिवसेनामध्ये बिनसले
जागा वाटपाच्या चर्चेच्या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा गटाचे संजय राऊत यांच्यात जोरदार चकमक झाली होती. संजय राऊत यांच्या भुमिकेवर काँग्रेस नेत्यांची तीव्र नाराजी आहे. आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या भुमिकेवर झालेला वाद शमत नाही तोच विदर्भातही शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात भुमिका घेतली असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. विदर्भात काँग्रेसची चांगली परिस्थिती असतानाही तेथे उद्धव ठाकरे गटाचे नेते आपल्या गटाची उमेदवारी दमटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर मुंबई शहर मधून काँग्रेसला हद्दपार करण्याची संपूर्ण रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात काँग्रेसच्या हाताला काहीही लागलेले नाही त्यामुळे तळकोकणातील या तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.

महायुतीमध्ये समन्वय
लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी विरोधी मतांचे ध्रुवीकरण झाले आणि महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या. मात्र विधानसभा निवडणुकीत तशी परिस्थिती नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये प्रचंड समन्वय दिसून येत आहे. भाजपने आपले अनेक स्थानिक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देऊ केले आहेत. आमदार राजेंद्र राऊत, माजी खासदार संजय काका पाटील, भाजपचे अंधेरी पूर्व मधील कार्यकर्ते मुरजी पटेल, भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे या आणि अशा अनेक नेत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात गेला तरी चालेल परंतु महायुतीची जागा निवडून आलीच पाहिजे, याची खबरदारी महायुतीचे नेते घेत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.