जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ या जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या त्वचारोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत असंख्य जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन व कृषी विभाग युध्दपातळीवर उपाययोजना करत आहे. राज्य शासनाने यापूर्वीच १ सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासननिर्णयान्वये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जनावरांचे वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. ‘लम्पी स्कीन’ हा नेमका काय रोग आहे. या रोगावर कोणत्या प्रकारचा उपचार करण्यात येतो. शेतकरी, पशुपालकांनी आपल्या जनावरांची नेमकी काय काळजी घ्यावी. याबाबतची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
‘लम्पी स्कीन’ हा रोग १९२९ पासून १९७८ पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. नंतर हळूवारपणे या रोगाने शेजारच्या देशात शिरकाव केला. २०१३ नंतर या रोगाचा सर्वदूर प्रसार वेगाने होत आहे. आणि आता हा रोग अनेक युरोपीय व आशियायी देशात पसरला आहे. भारतात या रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला. महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथून मार्च २०२० या महिन्यापासून झालेला आढळून आलेला आहे. येथील साथरोगाचे पक्के निदान गोपाळ येथील राष्ट्रीय रोगनिदान प्रयोगशाळेत झाले आहे.
रोगाची कारणे व प्रादुर्भाव – हा आजार एका विषाणूमुळे गुरांमध्ये परसतो. ज्याला ‘लंपी स्किन डिसीज व्हायरस’ (LSDV) म्हणतात. त्याच्या तीन प्रजाती आहेत. ज्यामध्ये पहिली प्रजाती ‘कॅप्रीपॉक्स व्हायरस’ आहे. त्यानंतर ‘गोटपॉक्स व्हायरस’ आणि ‘मेंढीपॉक्स व्हायरस’ अशा आणखी दोन प्रजाती आहेत. हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. शेळ्या-मेंढयांत आढळून येत नाही. गोवर्गात तीस टक्के, म्हैसमध्ये १.६ टक्के तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते. या आजारात मृत्यू दर १-५% पर्यंत आढळून येतो. दूग्ध उत्पादन मोठया प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.
विदेशी वंशाच्या (पाठीवर वशिंड नसलेल्या जर्शी, होल्स्टेन आदी) आणि संकरीत गायीमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा (पाठीवर वशिंड असलेल्या भारतीय जाती) रोगबाधेचे प्रमाण अधिक असते. सर्व वयोगटातील (नर व मादी) जनावरात आढळतो मात्र लहान बासरात प्रौढ़ जनावरांच्या तुलनेत प्रमाण अधिक असते. आजारामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दूग्ध उत्पादन मोठया प्रमाणावर घटते तसेच कांही वेळा गर्भपात होतो व प्रजननक्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
रोगप्रसार – या आजाराचा फैलाव बाह्य किटकाद्वारे (मच्छर, गोचिड, माशा इ.) तसेच आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणांमधून वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, दूध, लाळ, विर्य व इतर स्त्रावामुळे होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातून व स्तनावरील व्रणातून रोगप्रसार होतो.
लक्षणे – बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे २५ आठवडे एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीना सूज येते. सुरवातीस भरपूर ताप येतो. दूग्ध उत्पादन कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात १० ते १५ मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात. काही वेळा तोंड, नाक व व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळ्यात व्रण येतात यामुळे दृष्टी बाधित होण्याची शक्यता असतो. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंना स्तनदाह आजाराची बाधा पशूंमध्ये होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.
रोगनियंत्रण – हा रोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग असल्याने प्रसार होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अमलात आणणे महत्वाचे आहे. याकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रादुर्भावग्रस्त भागापासून ५ कि.मी. च्या त्रिज्येमध्ये येणाऱ्या गावातील गो व महीषवर्गीय पशुंना शेळ्यांच्या देवीवरील लस (Goat Pox Vaccine -Uttarkashi Strain) चा वापर करुन प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करण्यात यावे. निरोगी जनावरांना या आजाराची लागण होवू नये म्हणून बाधित जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवण्यात यावीत. निरोगी तसेच बाधित जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याकरीता व चराई करीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. निरोगी जनावरांमध्ये या रोगाचा फैलाव विविध प्रकारचे मच्छर, गोचिड, माशा इ. मार्फत होत असल्याने जनावरांचे गोठे व त्या लगतच्या परिसरात मच्छर, गोचिड, माशा इ. निर्मूलन करण्यासाठी विविधि अॅलोपॅथीक व आयुर्वेदिक औषधींचा वापर करुन तात्काळ फवारणी करण्यात यावी. जनावरांचे गोठे व त्या लगतच्या परिसरात संबंधित ग्रामपंचायत / नगरपंचायत / महानगरपालिका यांचे कडील यंत्रणेच्या मदतीने तात्काळ फवारणी करून घेण्यात यावी. तसेच, रोग प्रादुर्भावामुळे जनावरचा मृत्यु झाल्यास त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील शास्त्रोत पध्दतीने विल्हेवाट लावण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत,नगरपंचायत, महानगरपालिका यांची आहे.
बाधित जनावरांवर औषधोपचार करण्यासाठी वापरात आणलेल्या सिरींजेस, निडल्स इ. यांचा पुनर्वापर न करता त्या तात्काळ नष्ट करण्यात याव्यात. या रोगाची लागण झालेल्या जनावराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने अशा जनावरांना इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची शक्यता असल्याने अशा जनावरांना ५ ते ७ दिवस आवश्यकतेनुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके देण्यात / टोचण्यात यावीत. त्या सोबतच ताप कमी करणारी औषधे, प्रतिकार शक्तीवर्धक औषधी जसे की लिव्हर टॉनिक, जीवनसत्व इ. वेदनाशामक व अॅटी हिस्टॅमिनिक औषधी केंद्र शासनाच्या प्रोटोकॉलनुसार देण्यात यावीत. त्वचेवरील जखमा बऱ्या होण्यासाठी विविध प्रकारचे मलम, औषधी व तेल यांचा वापर करण्यात यावा. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४ (१) नुसार पशु/जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी याबाबतची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.
बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकांनी योग्य पोशाख परिधान करावा. हात डेटॉल किंना अल्कोहोल मिश्रित सनीटायझरने स्वच्छ धुवून घ्यावेत. तपासणी झाल्यानंतर कपड़े व फूटवेअर गरम पाण्यात धुवून निर्जंतुक करावेत. अशा जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करुन घेण्यात यावे. शास्त्रीय दृष्ट्या या साथीच्या काळात दूध उकळून प्यावे किंवा मांस शिजवून खावे. प्रादुर्भाव ग्रस्त भागात जनावरांची ने आण वाहतूक बंदी आणावी तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात यावे रोगग्रस्त जनावरचा मृत्यू झाल्यास मृतदेह ८ फूट खोल खड्ड्यात पुरावा. शेतकरी पशुपालकांनी ‘लम्पी स्कीन’ रोगाला मुळीच घाबरून न जाता तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावे.
संकलन – जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव.