⁠ 
रविवार, मे 5, 2024

महिन्याच्या सुरुवातीलाच झटका देणारी बातमी: गॅस सिलिंडर 204 रुपयांनी महागला

जळगाव लाईव्ह न्यूज : 1 ऑक्टोबर 2023 : दर महिन्याच्या पाहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार आज कंपन्यांनी सिलिंडरचे दर जाहीर केले असून ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

किती रुपयांनी महागला सिलिंडर?
कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार आज व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 204 रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही दरवाढ झाली नसून यामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या दरवाढीमुळे मुंबईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 1,684 रुपयांना विकला जाणार आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत.

देशातील इतर महानगरांमध्ये किमती?
कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,839.50 रुपयांना खरेदी करावा लागणार. मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1,482 रुपयांवरून 1,684 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून येथे 1,695 रुपयांवरून 1898 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जाणार आहे.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी मोठी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तो जुन्याच दरावर कायम आहे. 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर जळगाव मध्ये 903 रुपयांना उपलब्ध आहे.