जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसह काही ठिकाणी वित्तहानी देखील झाली आहे. शनिवारी संध्याकाळी आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्याचे तहसिलदार अमोल मोरे यांच्यासोबत वाकडी शिवारातील सीताराम आनंदा पाटील यांच्या शेतातील मका पिकाच्या व रोकडे शिवारातील दादा मानसिंग राठोड यांच्या केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी गारपीट व अवकाळी पावसामुळे समोर अतिशय विदारक असे चित्र शेतांमध्ये पाहायला मिळाले. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावा अश्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना दिल्या. यावेळी भाजपा तालुका चिटणीस दीपक राजपूत, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटे, कैलास पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.
केळी – फळबागासह गहू, कांदा, ज्वारी, मका आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, मात्र शेतकरी बांधवांनी खचून न जाता आलेल्या संकटाचा सामना करावा, मी सोमवारी मदत व पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने शासन दरबारी जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिले.