जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांनी मोठी विजयी आघाडी घेतली आहे. निकम यांना तब्बल ५०,७८६ मतांची आघाडी मिळाली आहे. उज्ज्वल निकम यांना २,४७,००८ मतं मिळाली आहेत. तर वर्षा गायकवाड यांना आतापर्यंत एक लाख ९३ हजार ५०५ मतं मिळाली आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी २६ आणि महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील पक्षनिहाय आघाडी पाहायची झाल्यास भाजपा १४, शरद पवार गट ७ आणि काँग्रेस १०, शिंदे गट ६ आणि ठाकरे गट प्रत्येकी ९ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सर्वात जास्त फटका बसताना दिसत आहे. महाराष्ट्रात 45+ ची घोषणा करणाऱ्या महायुतीला केवळ २१ जागा मिळताना दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला २६ जागांवर विजय मिळत असल्याचे कलावरुन स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत कलावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
2019 मध्ये भाजपने 23 जागांवर आणि शिवसेनेने 18 (शिवसेना एकत्र होती) जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागांवर तर काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची जोरदार कामगिरी झालेली दिसत आहे.