⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

‘या’ योजनेंतर्गत १२ पोटजातीतील गरजूंना मिळणार एक लाखांपर्यंतचे कर्ज, ३० सप्टेंबरपर्यंत करा अर्ज..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्रयरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत एक लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. २०२३-२४ साठी जिल्ह्यासाठी ३० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेसाठी कर्ज मागणी अर्ज वितरण १ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले‌ आहे.‌

कर्जविषयक माहिती :
कर्जामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. ८५ हजार (८५%), अनुदान रक्कम रु. १० हजार (१०%), अर्जदाराचा सहभाग रु.५ हजार (५%) असे एकूण १ लाख रुपये कर्ज (१००%) देण्यात येते. तीन वर्ष (३६ महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज दिले जाते.

उद्दिष्ट वितरण :
या योजनेत साधारणपणे पुरुष ५० टक्के व महिला ५० टक्के आरक्षण राहील. ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कारप्राप्त व्यक्तिंना प्राधान्य राहील. सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

पात्रता व निकष :
अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा. अर्जदाराचा Cibil Credit Score ५०० च्या वर असावा.

आवश्यक कागदपत्रे :
सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले दोन फोटो, अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धतेचा पुरावा ( भाडे पावती, करारपत्र), व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला, यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला. व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक/कोटेशन, अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज प्रक्रिया :
कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थींच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील. प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची संख्या उद्दिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थींची निवड चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने) करण्यात येईल. अर्जदाराच्या Cibil Credit Score‍ ५०० च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील. सहभाग रक्कमेपोटी ५ हजार रूपयांचा धनाकर्ष महामंडळाच्या नावे जमा करावा लागेल. कर्ज वितरणापूर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी २० उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील. कर्जदाराच्या वारसाचे १०० रूपयांच्या बाँडवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र, इतर वैधानिक दस्ताऐवजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. ३ वर्ष (३६ महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.