जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चा कार्यक्रम काही दिवसांपुर्वीच जाहीर झाला आहे. विधानसभा मतदार संघाकरीता जिल्ह्यात बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यात १८, १९, २०, २३ नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणुक खुल्या, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये प्राप्त अधिकाराने विधानसभा निवडणुक 2024 च्या कालावधीत संपूर्ण जळगाव जिल्हयात १८, १९, २० व २३ हे कोरडे दिवस म्हणून जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने १८ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६.०० वाजेपासुन मतदान संपण्या अगोदर ४८ तास कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. तर मतदानाच्या पूर्वीचा दिवस म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी संपुर्ण दिवस आणि तसेच मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस असणार आहे. त्यासोबतच मतमोजणीचा संपूर्ण दिवस म्हणजेच २३ नोव्हेंबर देखील कोरडा दिवस असेल असे आदेशात नमुद केले आहे.
सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी या कालावधी व वेळेत मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवाव्यात आणि या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे नावे असलेली अनुज्ञप्ती महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ व ५६ अन्वये तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल अशा सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.