जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एलआयसीचे चेअरमन क्लब मेंबर तथा परिसरातील प्रसिद्ध फोटोग्राफर गणेश सुकलाल गुजर (वय ५३) यांचे शनिवारी (ता.१७) जळगाव येथील एका खाजगी दवाखान्यात कोरोना आजाराशी लढा देत असताना निधन झाले. गणेश गुजर हे धानोरा परिसरात फोटोग्राफर ते एलआयसी एजंट म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. तरुण वर्गाला नेहमी गणेश गुजर यांचे प्रेरणादायी विचाराने प्रोत्साहन मिळत असे, परंतु त्यांच्या अचानक निघून जाण्याने तरुणांचे आदर्श हरपले आहे.
धानोरा परिसरात फोटोग्राफी व एलआयसी मध्ये नावाजलेले व्यक्तिमत म्हणून गणेश गुजर यांच्याकडे पाहिले जात होते. गावात कोणत्याही कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेणारे व तरुणांना नेहमी मोलाचे मार्गदर्शन करणारे गणेश गुजर यांना कोरोना सारख्या आजाराने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हेरले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जळगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी स्वतःला दाखल करून घेतले परंतु त्यांचा शनिवारी (ता. १७) मृत्यू झाल्याची बातमी सोशल मिडीयावर व्हायरल झाली व संपूर्ण तालुका या घटनेने सुन्न झाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन्ही मुली उच्च शिक्षित
गणेश गुजर यांना मयुरी व खुशबू अशा दोन मुली असून त्या दोन्हीही बीई कॉम्पुटरचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे उच्च पदावर नोकरीला आहे. तर लहान मुलगा सारस हा १२ वीला शिकत आहे.
फोटोग्राफी ते एलआयसी चेअरमन क्लब मेंबर
गणेश गुजर हे नेहमी हसतमुख व्यक्तिमत्व व साखर सारखी मधुर वाणी असल्याने त्यांनी धानोरा सह संपूर्ण तालुक्यात आपला फोटोग्राफी व्यवसायासोबत एलआयसी एजंट म्हणून काम करण्यास सुरुवात करून अगदी कमी वेळेत त्यांनी एलआयसी चेअरमन क्लब मेंबर पर्यंत मजल मारली होती.
तरुणांचे होते आदर्श
गावातील प्रत्येक समाजाच्या तरुणांना कै.गुजर नेहमी शिक्षण व नोकरी साठी लागणारे सहकार्य करीत असत. काहीतर नुसते त्यांच्या बोलण्यामुळे देखील प्रोत्साहित होऊन जात त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला नेहमी एक घोळका जमा होत असे. तरुणांचे आदर्श अचानकपणे निघून गेल्याने गावातील प्रत्येकाच्या व्हाटसअप वर कै. गणेश गुजर यांचे स्टेट्स व श्रद्धांजली देणारे बॅनर झळकताना दिसून आले.
सुखी परिवार पोरका झाला
धानोरा येथील सदगुरू नगर भागात राहणारे गणेश गुजर यांना दोन मुली मयुरी व खुशबू, मुलगा सारस, आई गंगाबाई व पत्नी रोहिणी असा परिवार असून गुजर परिवारातील कर्ते गणेश गुजर अचानक निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवारावर पोरका झाला आहे.
कोरोना प्रती नेहमी राहिले दक्ष
गणेश गुजर यांचे एलआयसीचे व फोटोग्राफीचे कामानिमित्त संपूर्ण परिसरात फिरणे सुरु असायचे. कै. गुजर यांनी नेहमीच कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आपली योग्य ती काळजी घेतली व परिसरातील लोकांनाही त्यांनी जनजागृती करून एक प्रकारे कोरोना योद्धाचे कार्य पार पाडले. परतू कोरोनाच्या या महाभयंकर संसर्गाने त्यानाही आपल्या कवेत घेतल्याने नागरिकांनी आता तरी आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे.