जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२३ । राज्यातील अनेक भागात आजही रस्ते सोयी सुविधा नसल्याचे वास्तव अनेकदा समोर आले आहे. पावसाळ्यात तर शेतकऱ्यांना शेत रस्ते व्यवस्थित नसल्याने पिकविलेला माल घरी आणण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. यातच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कलाली येथील शेतकऱ्यांनी शेतातील रस्त्यासाठी थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहलं आहे.
‘मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमची कर्जमाफी नको, की सबसिडी नको, फक्त आम्हाला आमच्या शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी कलाली गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही मतदानावर बहिष्कार करू असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
कलाली शिवारात सुमारे १०० शेतकऱ्यांची ४०० एकर बागायती शेती आहे. तापी नदीकाठावर खोऱ्यात ही शेती असल्याने उत्पन्न चांगले येते; मात्र या शेतातून माल ने-आण करण्यासाठी एकच रस्ता आहे. यातही पावसामुळे रस्ता पूर्ण खराब झाला. येथील गावकऱ्यांनी सुरवातीला स्थानिक प्रशासनाला पत्र लिहूनही काही झाले नसल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांकडे रस्ता देण्याची तोंडी मागणी केली आहे. शिवाय मागणी मान्य न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असताना आमच्या गावात अद्यापही शेत रस्ते होऊ शकले नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात आमच्या शेतात जाता येत नाही की पिकविलेला माल घरी आणता येत नाही, शेतात पिकविलेला माल घरी आणण्यासाठी एक ट्रॅक्टर ओढण्यासाठी त्याला अजून दोन ट्रॅक्टर जोडावे लागत आहेत, त्यामुळे तीन पट खर्च वाढत आहे.
पालकमंत्र्यांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिले आहे, तर मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही एक किमी रस्ता करून दिला असला तरी अजून तीन किमी रस्ता बाकी असल्याने, मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे साद घालत रस्त्याची मागणी केली आहे. आम्हाला काही नको, ना योजना, नको, सबसिडी नको, कर्जमाफी नको, फक्त तेवढा रस्ता करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी आणि शेत रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा ही या शेतकऱ्यांनी दिला आहे