जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । जगभरात कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. जगातील १२ देशात ९२ रुग्ण आढळून आल्याने भारतात देखील केंद्रीय आरोग्य संघटनेने सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. केंद्राच्या अलर्ट नंतर महाराष्ट्र सरकारने देखील काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे काय? मंकीपॉक्सची लक्षणे कोणती आणि त्याचा संसर्गाचा धोका किती? या सर्व बाबींची माहिती या बातमीद्वारे आम्ही देत आहोत.
मंकीपॉक्सची लक्षणे काय?
आरोग्यतज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोसिस (प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरलेला विषाणू) आहे, ज्याची लक्षणे स्मॉलपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसतात. मंकीपॉक्स असलेल्या लोकांमध्ये ताप, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे, थकवा येणे आणि हातावर व चेहऱ्यावर कांजण्या, ग्रोवर सारखी पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात.
असा वाढू शकतो संसर्गाचा धोका
मंकीपॉक्सचे रुग्ण सध्या देशात आढळून आलेले नसले तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील हा आजार पसरू शकतो.