जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । भडगाव शहरातील चोरीच्या घटनेतील तीन संशयितांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ मोबाइल आणि चार हजार रुपये रोख हस्तगत केले.सुनील पवार (वय २२), अनिल सूर्यवंशी (वय २७), विजय घोडेस्वार (वय १९) असे संशयितांचे नाव आहे. त्यांना येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सविस्तर असे की, भडगावातील यशवंतनगर भागात अर्जून भिल्ल यांच्याकडे ९ डिसेंबरला घरफोडी झाली. त्यात सुमारे ८ हजार ५०० मुद्देमाल चोरांनी लांबवला होता. याप्रकरणी ११ डिसेंबरला फिर्याद दाखल झाली होती.१६ रोजी एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी भडगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करून संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार शहरात गुप्त माहितीनुसार शोध घेऊन सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक रणजित जाधव, नंदलाल पाटील, किशोर राठोड, भगवान पाटील, ईश्वर पाटील, उमेश गोसावी, विनोद पाटील, श्रीकृष्ण देशमुख व चालक पवार यांच्या पथकाने संशयित सुनील परशुराम पवार (वय २२), अनिल विरभान सूर्यवंशी (वय २७), विजय प्रकाश घोडेस्वार (वय १९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाईल व चार हजार रुपये रोख असे एकूण २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पंचनामा केला.