⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मविप्र वाद : पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा जळगावात, भोईटेंच्या घरी चौकशी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । शहरातील मविप्र वाद प्रकरणी ऍड.विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे, कोथरूड पोलिसांचा मोठा फौजफाटा जळगावात दाखल झाला आहे. स्वारगेट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांचा देखील पथकात समावेश असल्याचे समजते.

मविप्र’च्या वादातून अॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी सात पानांची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या ९ जणांवर ‘मकोका’ लावण्यात आलेला आहे. दरम्यान, आज पहाटे कोथरूड पोलिसांचे ७० कर्मचारी, अधिकारींचे पथक जळगावात धडकल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार स्थानिक पोलिसांना सोबत घेत पुणे येथील सहा मुख्य संशयितांच्या घरी पोहचले आहे. पथक या पाचही जणांच्या घरी झाडाझडती घेणार आहे. भोईटे आणि देशमुख यांच्या घरी पथक तळ ठोकून आहे. पोलीस ‘मविप्र’ या संस्थेशी संबंधित कागदपत्र, संगणक वैगरे महत्वपूर्ण पुरावे ताब्यात घेणार असल्याचे कळते.

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथक प्रमुख तथा पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी सादर केलेला दि. ३० ओक्टोंबर २१ तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांच्याकडील गोपनीय अहवाल अन्वये आरोपी नामे १) तानाजी केशव भोईटे, रा. ए-१/ए. १००१. माणिकचंद मलबार, कोंढवा पुणे २) विरेंद्र रमेश भोईटे, रा. भोईटेनगर, जळगाव, ३) जयंत फकीरराव देशमुख, रा. हत्ती बिल्डींग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ४) जयवंत पांडुरंग येवले, रा. शिवाजीनगर ता. यावल, जि. जळगाव ५) भगवंतराव जगतराव देशमुख, रा. वरणगाव. ता. भुसावळ, जि.जळगाव, ६) गोकुळ पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोरा, ता.जि. जळगाव, ७) बाळू गुलाबराव शिके, रा. बोरायल गेट ता. यावल, जि. जळगाव ८) महेंद्र वसंतराव भोईटे, रा. कोल्हेनगर, जळगाव, ९) शिवाजी केशव भोईटे, रा.पुणे यांचेविरूध्द दाखल असलेला कोथरूड पोलीस स्टेशन गुरनं. ३/२०२१, भा.दं. वि. कलम १२० (ब) ३३१, ३८४, ३७९, ४४७, ४४८, ४४९, ४५४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०४, ५०६ (२), ५११, १०९, ३४ या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) व ३ (४) चा अंतर्भाव करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे म्हटले होते.

जळगावात सकाळीच पथक धडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी खडसे आणि महाजन यांनी मकेका कारवाईबाबत वक्तव्य केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा केली असता अद्याप चौकशी सुरू असून चौकशीनंतर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.