जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । पशुपक्षी फर्मच्या परवानगीसाठी पंटरच्या माध्यमातून ८ हजारांची लाच घेणाऱ्या धुळ्याचे औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख याच्या जळगाव आणि धुळे येथील घरांची बुधवारी झडती घेण्यात आली. त्यातसुमारे ५० लाखांचे घबाड मिळून आले आहे. यात रोख रकमेसह दागिन्यांचा समावेश आहे. संशयित देशमुख यांना बुधवारी दुपारी धुळे न्यायालयात उभे केल्यावर त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

शिरपूर येथील नागरिकाला पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे होते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील पूर्ण केली होती. मात्र, स्थळ परीक्षण व इतर प्रक्रियेसाठी ८ हजारांच्या लाचेची मागणी झाली. ही लाच देशमुख यांचा पंटर तुषार जैन याच्याकडे देण्याची सूचना होती. याबाबत संबंधित तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मंगळवारी तुषार जैन व नंतर देशमुख यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर जळगाव येथील मोरया हाइट्सजवळ असलेल्या द्रौपदी नगरातील घराची झडती घेतली.
त्यासाठी जळगाव पथकाची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही घरझडती सुरू होती. बुधवारी दुपारी किशोर देशमुख व तुषार जैन यांना धुळे न्यायालयात उभे करण्यात आले. या दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. धुळे एलसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंके व त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, त्यांच्याकडे इतर बाबींची विचारणा सुरु आहे.
घर झडतीत आढळली लाखोंची रोकड, दागिने
झडतीत ३१ लाख ३० हजार १०० रुपयांची रोकड मिळून आली. याशिवाय १७ लाख ४६ हजार १०० रुपये किमतीचे सोने व २२ लाख ७६० रुपये किमतीचे चांदीच दागिने देखील मिळून आले. एकूण ४९ लाख ७३ हजार ९५० रुपयांचे घबाड पथकाने जप्त केले आहे. शिवाय तसा अहवाल बनवून वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.