मनपा निवडणुकीआधी ललित कोल्हे तुरुंगातून बाहेर येणार?

डिसेंबर 25, 2025 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे सध्या नाशिक कारागृहात आहे. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीआधी कोल्हे जामीनावर बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या बोगस कॉल सेंटरप्रकरणी जळगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. याच पार्श्वभूमीवर ललित कोल्हेंसह सूत्रधार अकबर व हॅण्डलर आदिल या तिघांचे जामीन अर्ज कोर्टाने बुधवारी फेटाळले.

lalitkolhe

काय आहे प्रकरण?
२८ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील एल. के. फार्म हाऊसवर छापा टाकला होता. तिथे सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याच्यासह मुख्य हँडलर इम्रान खान आणि एकूण १३ जणांविरुद्ध गुन्ह्याची व्याप्ती आणि सहभाग स्पष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हेसह इतर संशयित आरोपी कारागृहात आहे.

Advertisements

या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करून कायद्याचे ज्ञान असणारे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे संशयित या प्रकरणात कसे संपर्कात आले. त्यांच्यात आर्थिक हिस्से वाटे कसे ठरले होते, कोणी कोणते काम बघायचे याची जबाबदारी वाटप करण्यात आली होती याबाबत ठोस पुराव्यांसह हे दोषारोपपत्र सादर केले आहे. संघटितपणे कट रचून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्याचा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्याची व्याप्ती अधिक असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोषारोपात म्हटले आहे.

Advertisements

याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ललित कोल्हे, सूत्रधार अकबर आणि हॅण्डलर आदिल या तिघांचे जामीन अर्ज न्यायालयातर्फे नामंजूर करण्यात आले. यामुळे कोल्हेंची महापालिका निवडणुकीआधी जामीनावर बाहेर येण्याची शक्यता कमी आहे.

ललित कोल्हे यांनी जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जोरदार तयारी काही महिन्यांपासून सुरू केली होती. मात्र, त्याआधीच बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे ते थेट पोलिसांच्या रडारवर आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now