एक-दोन नव्हे.. त्याने तब्बल 50 वर्ष पाहिली चाळीसगाव स्टेशनवर प्रेयसीची वाट, वाचा ही प्रेमकथा?

फेब्रुवारी 14, 2026 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते, पण काही कथा काळालाही हरवून जातात. जळगावच्या चाळीसगाव शहरातील ही एक हृदयस्पर्शी कथा आहे, जिथे एका प्रेमवीराने आपल्या प्रेयसीची प्रतीक्षा तब्बल ५० वर्षे केली. जगप्रसिद्ध कलामहर्षी केकी मूस असं त्यांचं नाव असून निलोफर मोदी असं त्याच्या प्रेयसीचे नाव होते. आज व्हॅलेंटाईन डे दिनानिमित्त केकी मूस यांची ही बातमी प्रसिद्ध करत आहोत.

keki mus

केकी यांचा मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत १९१२ मध्ये एका पारशी कुटूंबात जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव कैकुश्रु माणिकजी मूस. त्यांची आई मात्र त्यांना लाडाने ‘केकी’ म्हणायची. नंतर हाच अवलिया कलाकार केकी जगासाठी कलामहर्षी केकी मूस झाला.

Advertisements

मुंबई येथे शिक्षण घेत असताना केकी मूस यांचं मन निलोफर मोदींवर जडलं. दोघंही Wilson College मध्ये शिक्षण घेत होते. एका चित्रकला स्पर्धेत केकी यांनी जलरंगात रेखाटलेलं बुद्ध जन्माचं चित्र पाहून निलोफर यांनी त्यांच्या कलेची तोंड भरून स्तुती केली. आणि त्यांच्या कलेच्या प्रेमात पडल्या. आणि इथून सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा प्रवास.

Advertisements

आयुष्यभर सोबत राहण्याचं स्वप्न पाहत केकी मूस कायमचे चाळीसगाव येथे परतण्याचा निर्णय घेतात. निलोफर त्यांना मुंबई रेल्वे स्थानक पर्यंत सोडायला येतात. गाडी सुटण्याच्या क्षणी ती म्हणते — “तू हो पुढे… मी मागच्या पंजाब मेलने येते. रात्रीच जेवण सोबत करूया.” आणि इथून नियतीने वेगळंच पान उघडलं.

केकी मूस विश्वासाने चाळीसगावात पोहोचले. रात्री पंजाब मेल येण्याची वेळ झाली. गाडी थांबली, प्रवासी उतरले, पण ती आलीच नाही. तरीही केकी मूस यांनी तिच्या त्या वचनावर विश्वास ठेवला. पुढील ५० वर्षे, रोज रात्री पंजाब मेल येईपर्यंत त्यांचे घर दरवाजे आणि खिडक्या उघड्या राहायच्या, तिच्या स्वागतासाठी. गाडी निघून गेल्यानंतर ते जेवण करायचे, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रतीक्षा सुरू करायची.

मात्र केकी यांची ही लव्हस्टोरी आता जगप्रसिध्द झाली आहे. ते ज्या घरात राहिले तिथेच त्यांनी ३१ डिसेंबर १९८९ ला अखेरचा श्वास घेतला. याच घरात राहून त्यांनी देश-परदेशांतल्या पुरस्कारांवर आपलं नावही कोरलं. ते जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी होते.त्यांच्या निधनानंतरही ही वास्तू जपली जात आहे.

आजच्या वेगवान युगात प्रेमाच्या बदलत्या व्याख्यांमध्ये केकी मूस यांची ही कथा खऱ्या प्रेमाचं एक अनोखं उदाहरण ठरते. प्रेम कधी कधी मिळण्यात नसतं… तर आयुष्यभर वाट पाहण्यातही असतं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now