जळगाव जिल्ह्यात कानुबाई मातेचा उत्सव जल्लोषात साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यासह खान्देशाचे आराध्य दैवत असलेल्या कानुबाई मातेचा उत्सव आज सोमवार जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अबाल वृद्ध तल्लीन होवुन पारंपारीक ठेका धरतांना दिसुन आले, तर फुगड्यांसह महिलांनी नृत्यावर धरलेला ठेका कानबाईच्या उत्सव द्विगुणीत झाला.
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने नागरिकांनी घरोघरी साजरा केला. यानिमित्ताने बाहेरगाव राहत असलेले कुटूंब एकत्र आल्याचे चित्र होते. दिवसभर उपवास करून सायंकाळी कानबाईचे पूजन, आरतीनंतर पुरणपोळी, साखर (खीर) नैवेद्य दाखविण्यात आला. भाविकांना साळीच्या लाह्या, बत्ताशांचा प्रसाद देण्यात आला. अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत कानबाईची गाणी म्हणत रात्र जागविली.
कानबाई मातेची अलंकाराने सजवून चौरंगावर विधिवत स्थापना केली जाते, काही भाविक परंपरेनुसार विधिवत दोन नारळाची कानुबाईची, कानुबाई रानबाई, कानबाई कण्हेर, हातापायाची कानबाई अशा विविध पध्दतीने स्थापना किंवा मांडणी करतात. आज सोमवारी (ता. २८) सकाळी कानबाईच्या विसर्जन करण्यात आले. यावेळी सकाळी कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवण्यात आले. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघाले. वाजत गाजत कानुबाई मातेचा उत्सव साजरा करण्यात आला.