जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । शहरातील कांचन नगर परिसरात आज सकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा खुनाचा बदला घेण्यासाठी आज हा डाव साधण्यात आला होता. आज झालेल्या गोळीबारचा कट महिनाभरापासून शिजत होता. बुधवारी रात्रभर ओली पार्टी केल्यानंतर सकाळी प्रत्यक्षात डाव साधण्यात आला.
गेल्यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश वय-२८ याचा हल्ला करून खून करण्यात आला होता. खून प्रकरणी आकाश सपकाळे, गणेश सोनवणे, विशाल सपकाळे, रुपेश सपकाळे, महेश निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. या संशयितांना पुढे जामीन मंजूर करण्यात आला होता. जुन्या वादातूनच बदला घेण्यासाठी आज हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी घटना घडल्यानंतर पोलिसांनी लागलीच सूत्रे फिरविण्यास सुरुवात केली. हल्ला करून पळ काढण्याच्या प्रयत्नात पडल्याने विक्की उर्फ मयूर दीपक अलोने हा जखमी होऊन घटनास्थळी पडला होता. शनीपेठ पोलिसांनी धाव घेत त्याला ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तर घटनेत प्रमुख संशयीत म्हणून नाव येत असलेल्या बाबू अशोक सपकाळे व सोनू अशोक सपकाळे या दोघांना शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे व किशोर निकुंभ यांनी घरून ताब्यात घेतले. सर्व संशयितांची पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी कसून चौकशी केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश सपकाळे याच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव गेल्या महिन्याभरापूर्वी शिजला होता. बाबू सपकाळे याने विक्की अलोने यास गावठी कट्टा घेण्यासाठी ३० हजार रुपये दिले होते. चोपडा तालुक्यापासून जवळ मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावातून त्याने गावठी कट्टा आणि काडतुस खरेदी केला होता. बुधवारी सर्व मित्र एकत्र पार्टीसाठी बसले होते. रात्रभर पार्टी केल्यानंतर राकेशच्या खुनाचा आजच बदला घ्यायचा असे ठरले. गुरुवारी सकाळी ६ वाजता बाबू आणि सोनू यांना घरी सोडून इतर चौघे रिक्षाने निघून गेले. सकाळी ७.४५ च्या सुमारास विक्की अलोने, मिलिंद सकट, सुपड्या आणि बंटी महाले हे चौघे आकाशच्या घरी पोहचले. विक्की आणि मिलिंद दोन गावठी पिस्तुल घेऊन आकाशच्या घरात शिरले. पलंगावर झोपलेल्या आकाशच्या अंगावरील चादर बाजूला काढत तो आकाशच असल्याची खात्री पटल्यावर दोघांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. घरात ४ राउंड फायर करण्यात आले असता एक आकाशच्या हाताच्या करंगळीला लागल्याने तो जखमी झाला.
आकाशाचा भाऊ आणि वडिलांनी वेळीच धाव घेत प्रतिकार केल्याने आकाश बचावला. घरातून बाहेर पळ काढताना विक्की अलोने याचा पायऱ्यांवरून पाय घसरला आणि तो खाली पडला. विक्कीच्या डोक्याला लोखंडी खांब लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. इतर सहकाऱ्यांनी मात्र त्याला तिथेच सोडून पळ काढला. गोळीबारचा आणि कुटुंबीयांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. शनीपेठ पोलिसांनी धाव घेत जखमी विक्की अलोनेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.