⁠ 
शनिवार, मे 4, 2024

Jalgaon : ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा झाला उलगडा, खुनी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२४ । कानळदा रस्त्यावरील शेतात जिनिंग कामगार सुरेश परमसिंग सोलंकी (२६) याचा खून झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, या खुनाचा उलगडा झाला व खुनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

हा खूनअनैतिक संबंधाच्या वादातून झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून कामगाराचे ज्या महिलेशी संबंध होते तिच्या पतीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनास्थळी सापडलेले मंगळसूत्र कोणाचे आहे, हे त्याच परिसरातील महिलेने ओळखले अन् या खुनाचा उलगडा झाला

कानळदा रस्त्यावरील आसोदा शिवारात लक्ष्मी जिनिंगच्या मागे शेतात सुरेश परमसिंग सोलंकी या जिनिंग कामगाराचा शनिवार, २० एप्रिल रोजी मृतदेह आढळून आला होता. मयत सुरेश सोलंकी याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जबर वार केल्याचे देखील दिसत होते. मृतदेहापासून जवळच एका महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले. याशिवाय एक विस रुपयांचे नाणे देखील आढळून आले. पोलिसांनी या सर्व वस्तू तपासकामी ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात केली. ज्याअर्थी घटनास्थळी महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले त्याअर्थी घटनेच्या वेळी व ठिकाणी एक महिला हजर होती हे स्पष्ट झाले.

घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकाची मदत घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. त्यात काही संशयास्पद फुटेज आढळून आले. घटनास्थळावर आढळून आलेले महिलेचे पायातील पैंजण परिसरातील लोकांना दाखवले असता अशा प्रकारचे बाजारात रस्त्यावर मिळणारे नकली मंगळसुत्र आणि पैंजण पावरा समाजाच्या महिला वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिनींग परिसरातील पावरा समाजाच्या मजुर महिलांची सखोल चौकशी करण्यात आली.

पैंजण आणि मंगळसुत्र हे परिसरात राहणा-या एका मजूर महिलेचे असल्याची माहिती मिळाली. महिला पोलिसांच्या मदतीने तिची सखोल चौकशी केली असता तिने सर्व घटनाक्रम कथन केला. सदर महिलेचा पती व संशयित आरोपी रामलाल बारेला याने खून केल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला अर्थात रामलालची पत्नी हिचे मयत सुरेश सोलंकी या अविवाहीत तरुणासोबत सुत जुळले होते. घटनेच्या दिवशी घटनास्थळावर ती मयत सुरेश सोलंकी यास भेटण्यासाठी रात्रीच्या अंधारात २ वाजता दबक्या पावलांनी गेली होती. काही वेळाने तिचा पती रामलाल बारेला हा तिला शोधत शोधत त्याठिकाणी आला. दोघांना त्याने नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले.

दोघांना सोबत बघून रामलाल बारेला याचा राग मनात मावेनासा झाला. त्याने सुरेश सोलंकी याच्यासोबत झटापट केली. त्यावेळी रामलालची पत्नीने रामलाल यास सुरेशला मारु नको अशी विनवणी करुन सांगत होती. दरम्यान संशयित रामलाल याने कु-हाडीचा एकच घाव सुरेशच्या डोक्यात मागच्या बाजूने मारला. घाव वर्मी बसल्यानंतर तो मरण पावला. या झटापटील रामलाल बारेला याच्या पत्नीचे गळ्यातील मंगळसुत्र आणि पायातील पैंजण गळून पडले. हेच मंगळसुत्र आणि पायातील पैंजण पोलिसांच्या तपासात महत्वाचा दुवा ठरले.

या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील संशयीत आरोपी रामलाल बारेला यास २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.